Marathi

Uma: New Testament

Psalms

41

1जो माणूस गरीबांना यशस्वी होण्यासाठी मदत करतो त्याला अनेक आशीर्वाद मिळतील. संकट येईल तेव्हा परमेश्वर त्याला वाचवेल.
2परमेश्वर त्या माणसाचे रक्षण करेल आणि त्याचा जीव वाचवेल. पृथ्वीवर त्या माणसाला आशीर्वाद मिळेल. देव त्या माणसाचा त्याच्या शत्रूकडून नाश होऊ देणार नाही.
3तो माणूस जेव्हा आजारी पडून अंथरुणावर असेल तेव्हा परमेश्वर त्याला शक्ती देईल. तो आजारात अंथरुणावर पडला तरी परमेश्वर त्याला बरे करील.
4मी म्हणालो, “परमेश्वरा, माझ्यावर दया कर. मी तुझ्या विरुध्द पाप केले, पण मला क्षमा कर आणि मला बरे कर.”
5माझे शत्रू माझ्याविषयी वाईट बोलतात. ते म्हणतात, “तो कधी मरेल आणि विस्मरणात जाईल?”
6काही लोक मला भेटायला येतात परंतु त्यांच्या मनात काय आहे ते सांगत नाहीत. ते माझ्याबद्दलची काही बातमी मिळवण्यासाठी येतात. नंतर ते जातात आणि त्यांच्या अफवा पसरवतात.
7माझे शत्रू माझ्याबद्दलच्या वाईट गोष्टी कुजबुजतात, ते माझ्याविरुध्द वाईट गोष्टींच्या योजना आखतात.
8ते म्हणतात, “त्याने काही तरी चूक केली म्हणूनच तो आजारी आहे. तो कधीच बरा होऊ नये अशी मी आशा करतो.”
9माझा सगळ्यात चांगला मित्र माझ्याबरोबर जेवला. मी त्याच्यावर विश्वास ठेवला. पण आता तो माझ्याविरुध्द गेला आहे.
10म्हणून परमेश्वरा, माझ्यावर दया कर. मला उठू दे, मग मी त्यांची परत फेड करीन.
11परमेश्वरा, माझ्या शत्रूंना मला दु:ख द्यायला संधी देऊ नकोस. तरच मला कळेल की तू माझा स्वीकार केला आहेस.
12मी निरपराध होतो आणि तू मला पाठिंबा दिला होतास. तू मला उभे राहू दे, मग मी सदैव तुझी चाकरी करीन.
13इस्राएलाच्या देवाचा जयजयकार असो. तो नेहमी होता आणि नेहमी राहील आमेन आमेन.