Marathi

Uma: New Testament

Psalms

56

1देवा, लोकांनी माझ्यावर हल्ला केला म्हणून तू माझ्यावर दया कर. ते माझा पाठलाग करीत आहेत आणि रात्रंदिवस माझ्याशी लढत आहेत.
2माझ्या शत्रूंनी माझ्यावर दिवसभर हल्ला केला. मोजता न येण्याइतके लढणारे तिथे आहेत.
3मी जेव्हा घाबरतो तेव्हा तुझ्यावर भरंवसा ठेवतो.
4माझा देवावर विश्वास आहे म्हणून मी भीत नाही. लोक मला त्रास देऊ शकत नाहीत. देवाच्या वचनाबद्दल मी त्याचे गुणगान करीन.
5माझे शत्रू माझ्या शब्दांचा विपर्यास करतात. ते नेहमी माझ्या विरुध्द दुष्ट कारवाया करतात.
6ते एकत्र लपतात आणि मला मारण्यासाठी माझी प्रत्येक हालचाल टिपतात.
7देवा, त्यांच्या दुष्कृत्यांबद्दल त्यांना दूर पाठवून दे. परक्या राष्टांचा राग सहन करण्यासाठी त्यांना दूर पाठवून दे.
8मी खूप चिंताक्रांत झालो आहे. मी किती रडलो ते तुला माहीत आहे. तू माझ्या अश्रूंची नक्कीच मोजदाद ठेवली असशील.
9म्हणून मी तुला बोलावेन तेव्हा तू माझ्या शत्रूंचा पराभव कर. तू ते करु शकशील हे मला माहीत आहे, कारण तू देव आहेस.
10मी देवाच्या वचनाबद्दल त्याची स्तुती करतो. परमेश्वराने मला वचन दिले म्हणून मी त्याचे गुणगान करतो.
11माझा देवावर भरंवसा आहे म्हणून मला भीती वाटत नाही. लोक मला त्रास देऊ शकणार नाहीत.
12देवा, मी तुला खास वचने दिली आहेत आणि मी ती वचने पाळणार आहे. मी तुला माझे धन्यवाद अर्पण करणार आहे.
13का? कारण तू मला मृत्यूपासून वाचवलेस, तू मला पराभवापासून वाचवलेस म्हणून केवळ जिवंत असलेले लोकच जो प्रकाश पाहू शकतात अशा प्रकाशात मी त्याला अनुसरेन.