Marathi

Proverbs

25

1ही शलमोनाची आणखी काही नीतिसूत्रे आहेत. यहुदाचा राजा हिज्कीया याच्या नोकरांनी या शब्दांची नक्कल केली.2काही गोष्टी आपल्याला माहीत नसाव्यात अशी देवाची इच्छा असते. या गोष्टी आपल्यापासून लपवून ठेवायचा देवाला हक्क आहे. पण राजा ज्या गोष्टी शोधून काढतो त्याबद्दल त्याला मान मिळतो.3आकाश उंच आपल्या डोक्यावर आहे आणि जमीन आपल्या पायाखाली. राजांच्या मनाचेही तसेच आहे. आपण ते समजू शकत नाही.4चांदीतल्या निरुपयोगी वस्तू काढून ती शुध्द केली तर कामगार त्यापासून सुंदर वस्तू बनवू शकतो.5त्याचप्रमाणे राजापासून त्याचे दुष्ट उपदेशक दूर केले तर चांगुलपणा त्याचे राज्य भक्कम करील.6राजासमोर स्वत:ची फुशारकी मारु नका. आपण प्रसिध्द आहोत असे म्हणू नका.7राजाने स्वत:च तुम्हाला आमंत्रण दिलेले अधिक चांगले. पण तुम्ही स्वत: होऊनच गेलात तर इतर लोकांसमोर तुम्हाला गोंधळल्यासारखे होईल.8तुम्ही काही बघितले असेल तर त्याबद्दल न्यायाधीशाला सांगण्याची घाई करु नका. तुम्ही चुकत आहात हे दुसऱ्याने सिध्द केले तर तुम्ही गोंधळून जाल.9जर तुमचे आणि दुसऱ्या माणसाचे एकमत होत नसेल तर काय करायचे ते आपसात ठरवा आणि दुसऱ्याच्या गुप्त गोष्टी कुणाला सांगू नका.10तुम्ही जर त्या सांगितल्या तर तुम्हाला लाज वाटेल. आणि तुमचे वाईट झालेले नाव तुम्ही कधीही घालवू शकणार नाही.11तुम्ही जर योग्य वेळी चांगली गोष्ट संगितली तर ते चांदीच्या तबकातले सोन्याचे सफरचंद असेल.12जर शहाण्या माणसाने तुम्हाला समज दिली असेल तर ती शुध्द सोन्याच्या अंगठ्यापेक्षा किंवा दागिन्यांपेक्षा अधिक किंमती असल.13विश्वासू दूताची किंमत ज्यांनी त्याला पाठविले असेल त्यांच्या इतकीच असते. तो उन्हाळ्यातील हंगामाच्या दिवसांतल्या थंडगार पाण्यासारखा आहे.14जे लोक भेटी देण्याचे वचन देतात पण देत मात्र कधीच नाहीत ते पाऊस न आणणारे ढग आणि वारा यांसारखे आहेत.15धीराचे बोलणे माणसाच्याच काय पण राजाच्या विचारातही बदल करु शकते. हळूवार बोलणे फार परिणामकारक असते.16मध चांगला असतो पण तो खूप खाऊ नका. तुम्ही जर तो खूप खाल्लात तर तुम्हाला त्याचा तिटकारा येईल.17त्याचप्रमाणे तुमच्या शेजाऱ्याच्या घरात सारखे जाऊ नका. जर तुम्ही सारखे गेलात तर तो तुमचा तिरस्कार करायला लागेल.18जो माणूस खरे सांगत नाही तो धोकादायक असतो. तो सोटा, तलवार किंवा तीक्षण बाण यांसारखा असतो.19खोटे बोलणाऱ्यावर संकटकाळी विश्वास टाकू नका. तो माणूस दुखणाऱ्या दातासारखा वा जायबंदी झालेल्या पायासारखा असतो. तुम्हाला त्याची तेव्हा सर्वांत जास्त गरज असते तेव्हाच तो तुम्हाला इजा करत असतो.20दु:खी माणसासमोर आनंदी गीत गाणे हे त्याला थंडी वाजत असताना त्याच्या अंगावरील कपडे काढून टाकण्यासारखे आहे. ते सोड्यात शिरका मिसळण्यासारखे आहे.21तुमचा शत्रू जर भुकेला असला तर त्याला खायला अन्न द्या. तो जर तहानेला असला तर त्याला प्यायला पाणी द्या.22तुम्ही जर असे केलेत तर त्याला लाज वाटेल. त्याच्या डोक्यावर जळते निखारे टाकल्यासारखे ते असेल. आणि परमेश्वर तुम्हाला बक्षीस देईल कारण तुम्ही तुमच्या शत्रूशी चांगले वागलात.23उत्तरेकडून वाहणारा वारा पाऊस आणतो त्याचप्रमाणे चुगल्या राग आणतात.24वाद घालणाऱ्या बायकोबरोबर घरात राहाण्यापेक्षा छपरावर राहाणे अधिक चांगले.25खूप लांबच्या स्थळाहून आलेली, चांगली बातमी ही तुमच्या नहानलेल्या जीवाला थंडगार पाण्यासारखी असते.26जर चांगला माणूस दुबळा झाला आणि वाईट माणसाचा मार्ग आक्रमू लागला तर ते चांगल्या पाण्यात माती कालवल्यासारखे असते.27जर तुम्ही खूप मध खाल्लात तर तो तुमच्यासाठी योग्य नाही. त्याचप्रमाणे स्वत:साठी खूप मानमरातब घेण्याचा प्रयत्न करु नका.28जर माणूस स्वत:वर ताबा मिळवू शकत नसेल तर तो तटबंदी मोडून पडलेल्या शहरासारखा आहे.